पालघर जिल्ह्याचा पहिला `आयएएस` अधिकारी!

पालघर जिल्ह्याला लागूनच असलेल्या बोईसरमध्ये राहणाऱ्या वरुण वरनवाल यानं यशाचं आणि जिद्दीचं नवं उदाहरण समोर ठेवलंय. सायकलच्या दुकानावर काम करणारा वरुण आयएएसच्या परीक्षेत देशात 32 वा तर महाराष्ट्रात तिसरा आलाय.

Updated: Jun 20, 2014, 12:36 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
पालघर जिल्ह्याला लागूनच असलेल्या बोईसरमध्ये राहणाऱ्या वरुण वरनवाल यानं यशाचं आणि जिद्दीचं नवं उदाहरण समोर ठेवलंय. सायकलच्या दुकानावर काम करणारा वरुण आयएएसच्या परीक्षेत देशात 32 वा तर महाराष्ट्रात तिसरा आलाय.

ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर वरुण पालघर जिल्ह्याचा पहिला आयएएस अधिकारी ठरलाय. वरुण दहावीला असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याच्या यथाच्या मागे त्याची आई, बहिण आणि त्याचे छोटे भाऊ यांची मोठी साथ आहे. त्यांनी वरुणला शिकण्यासाठी पुण्याला पाठवलं आणि त्यानंतर सायकलचं एक दुकान चालवून वरुणनं आपलं शिक्षण पूर्ण केलं.

वरुणची हुशारी पाहून समाजसेवक डॉ. कॉम्पली यांनी आपल्या सगळ्या मित्रांना आणि शिक्षकांना त्याची मदत करण्याची विनंती केली. वरुणच्या या यशात त्याला या सगळ्याचाच हातभार असल्याचं तो सांगतोय.
`आयएएस` झाल्यानंतर पहिल्यांदाच वरुण जेव्हा बोईसरला परतला तेव्हा उपस्थितांनी त्याचं मोठ्या थाटात स्वागत केलं. लोकांचं प्रेम बघून वरुण भावूक झाला आणि त्याला त्याचे अश्रू आवरता आले नाहीत.
यावेळी, आपल्या मुलाचं कौतुक पाहून वरुणची आईही भारावून गेली... `अनेकांची मदत लाभली म्हणूनच आज माझा मुलगा आयएएस होऊ शकला... ज्यांना ज्यांना शिकायची इच्छा असेल त्यांना जरुर मदत करायला हवी` अशी प्रतिक्रिया वरुणच्या आईनं व्यक्त केली. यावेळी, तिनं वरुणला गरजू मुलांना मदतीचा हात देण्यास बजावलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.