नवी दिल्ली : मोहालीच्या मैदानावरील सुपर संडे सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतायत.
गेल्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न भारतीय संघ यावेळी करेल. गेल्या वर्षी २६ मार्च रोजी आयसीसी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगवले होते. मात्र या पराभवाचा बदला घेण्याची संधी आता भारताकडे आहे.
आजचा हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यातील विजयी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे तर दुसऱ्या संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल.
भारताच्या पाच पांडवाची लढत ऑस्ट्रेलियाच्या सुपर सिक्सशी भिडणार आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
भारत-ऑस्ट्रेलियाच्या यांत्याकील १२ टी-२० सामन्यांपैकी ८ सामने भारताने जिंकलेत तर ४ ऑस्ट्रेलियाने जिंकलेत. त्यामुळे टी-२० मध्ये भारताचे पारडे जड आहे. मात्र असे असले तरी ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि अॅडम झाम्पा यांच्यापासून सावधान राहवे लागेल.