बँकॉक : जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडुंनी चांगली कामगिरी केली आहे. भारताने 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे. ज्यात महाराष्ट्राला 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळाले आहे.
इराणच्या शरीरसौष्ठवपटूने गतवेळी हुकलेले जगज्जेतेपद पुन्हा एकदा काबीज केले आहे. सुपर हेवीवेट गटात करीम शाहरूखीने 9 प्रतिस्पर्ध्यींवर मात करत जगतजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
जगज्जेतेपदाच्या लढतीत भारताच्या बॉबी सिंगने चांगली कामगिरी करत करीमला कडवी झुंज दिली. प्रेक्षकांनीही बॉबी सिंगच्या नावाचा जयघोष करत त्याला पाठिंबा दर्शवला.
भारताच्या जगदीश लाड आणि विपीन पीटरने 85 आणि 90 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे. यजमान थायलंडने गतवर्षाप्रमाणे यंदाही पुरूष गटातील सांघिक जेतेपद मिळवले. त्यामुळे इराणला दुसऱ्या तर भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
'गेल्यावर्षीपेक्षा चांगली कामगिरी करण्याचं लक्ष्य यंदा भारतीय संघापुढे होते. सर्वात मोठा संघ घेऊन आम्ही बँकॉकमध्ये गेलो होतो. खेळाडूंनी गेले 3 महिने प्रचंड मेहनत घेतली. 4 सुवर्ण पदकांसह 11 पदके याअगोदर विदेशात आम्ही कधीच जिंकलो नव्हतो. त्यामुळे मेहनतीचे फळ मिळाले आहे. भारताच्या खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादन केलं.' अशी प्रतिक्रिया भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे वसरचिटणीस चेतन पाठारे यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.