मुंबई : टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे. या आठ जणांमध्ये बहुतेक जण हे भारताचेच माजी खेळाडू आहेत.
रवी शास्त्री, व्यंकटेश प्रसाद, संदीप पाटील हे तिघं या पदासाठीचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. या तिघांबरोबरच रॉबिन सिंग, लालचंद राजपूत, बलविंदरसिंग संधू, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टुअर्ट लॉ आणि जेसन गिलेस्पी यांनीही कोच होण्याची इच्छा बीसीसीआयपुढे व्यक्त केली आहे.
या आठ जणांबरोबरच टॉम मुडी आणि राहुल द्रविड यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. याआधीचे भारताचे चारही कोच हे परदेशी होते. यंदा मात्र बीसीसीआय भारतीय खेळाडूच कोच व्हावा यासाठी उत्सुक आहे. ज्या खेळाडूला भारतीय भाषा येते त्याला प्राधान्य द्यायचं बीसीसीआयनं ठरवलं आहे, त्यामुळे विदेशी खेळाडूंची कोच म्हणून वर्णी लागणं कठीण झालं आहे.
या आठ जणांपैकी रवी शास्त्री आणि संदीप पाटील या दोघांमध्येच प्रमुख शर्यत आहे. तर व्यंकटेश प्रसादची भारताचा बॉलिंग कोच म्हणून वर्णी लागू शकते.