www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटच्या देवाचा खेळ याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी सगळ्यांची पावलं वळली होती ती मुंबईची क्रिकेट पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमकडं... सचिन तेंडुलकरसाठीही आजची खेळी स्पेशल, यादगार आणि अविस्मरणीय ठरली... कारण... पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...
सर डॉन ब्रॅडमन क्रिकेट कारकीर्दीतल्या आपल्या अखेरच्या इनिंगमध्ये शुन्यावर आऊट झाले होते... साक्षात ब्रॅडमननाच सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगमध्ये स्वतःचीच झलक दिसली होती. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि तेंडुलकरही शेवटच्या इनिंगमध्ये बॉम्बे डकवर आऊट होणार, अशी अटकळ होती. बुकींनी त्यावर करोडो रूपयांची बेटिंगही लावली होती... परंतु क्रिकेटच्या या देवाने आपल्या करोडो चाहत्यांना मुळीच निराश केले नाही. वानखेडेच्या होमपिचवर सचिनला जुन्या फॉर्ममध्ये खेळताना पाहताना करोडो क्रिकेटशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानच्या मैदानात सचिन तेंडुलकर नावाच्या बटुवामनाचं पहिलं पाऊल पडलं आणि गेल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत या तेंडल्यानं अख्खं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्व पादाक्रांत केलं.आपल्या दोन तपांच्या तपश्चर्येची अखेर घरच्या मैदानात करणा-या सचिनसाठी आजची इनिंग एकदम स्पेशल होती. कारण त्याला गुडलक देण्यासाठी अख्खं तेंडुलकर कुटुंबच वानखेडेवर आलं होतं.सचिनची बायको अंजली, कन्या सारा, मुलगा अर्जुन कारमध्ये बसून वानखेडेवर पोहोचले. त्याआधी घरातून निघतानाच अंजलीने सचिनला शुभेच्छा दिल्या.
क्रिकेटमधील जवळपास सगळेच विक्रम सचिनने मोडीत काढले. परंतु त्यापैकी एकही खेळी सचिनच्या आई रजनी तेंडुलकर यांनी मैदानात जाऊन पाहिली नव्हती. आपला मुलगा शेवटची मॅच खेळत असताना, त्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी मात्र ही मातोश्री आज वानखेडेवर पोहोचली होती. आणि आपली आई मॅच पाहण्यासाठी येणार म्हणून सचिनने खास तिच्यासाठी वानखेडेवर रॅम्पची सोयही केली होती.
सचिनच्या यशात तेंडुलकर कुटुंबियांव्यतिरिक्त आणखी कुणाचा मोलाचा वाटा असेल तर तो गुरू रमाकांत आचरेकर यांचा... आपल्या लाडक्या शिष्याचा खेळ पाहण्यासाठी आचरेकर सरदेखील वानखेडेवर पोहोचले... स्वतःची तब्येत चांगली नसतानाही. सचिन जेव्हा नेटमध्ये प्रॅक्टिस करायचा तेव्हा सचिनला आऊट करणा-या बॉलरला आचरेकर सर 1 रूपयांचं नाणं बक्षीस द्यायचे... आणि सचिन आऊट झाला नाही तर ते 1 रूपयाचं नाणं खुद्द सचिनला मिळायचं... अशी अनेक नाणी आतापर्यंत सचिननं आचरेकर सराकंडून मिळवलीत.
वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या दिवसाचा खेळ संपला, पण सचिन तेंडुलकर 38 धावांवर नाबाद राहिला.. त्यामुळे आचरेकर सराकंडून आणखी एक नाणं सचिनला नक्की मिळेल... आणि कदाचित भारतरत्न पुरस्कारापेक्षाही ते 1 रूपयाचं नाणं बहुमोल असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.