www.24taas.com, मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसेचे कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी अजितदादांवर केलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. मात्र राज्यात दुष्काळ असताना अशा घटना घडणं अयोग्य असल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे. कुणीही कायदा हाती घेऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अहमदनगरमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेक प्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संग्राम जगताप यांच्यासह ७ कार्यकर्ते आज भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. तर याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनींही मनसेच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं होतं.
बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी आणि सर्व मनसे कार्यकर्त्यांनी शांत रहावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. दुष्काळ, शिवाय १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, सार्वजनिक मालमत्तेचं होणारं नुकसान, हे पाहता मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्यावतीने आवाहन करण्यात आलं होतं.