www.24taas.com, झी मीडिया, पुणे
देव आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतात. मात्र पुणे जिल्ह्यातल्या पिंगोरी गावच्या लोकांना देव असल्याची प्रचीती आलीय. गेल्या वर्षी दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या या गावातल्या तलावात यावर्षी पुढची तीन वर्षे पुरेल इतकं पाणी जमा झालंय. पुण्याच्या दगडूशेठ गणपती ट्रस्टनं केलेल्या जलसंधारणाच्या कामातून ही किमया साधली गेलीय.
उजाड जमीन... रखरखलेली माती... नजर ठरेल तिथवर फक्त उघडं बोडकं माळरान... पाण्याचा मागमूसही नाही... चार महिन्यांपूर्वी ही परिस्थिती होती पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी गावातली... आता मात्र जादूची कांडी फिरवावी तसं या गावाचं रुपडं पालटलंय... पिंगोरीचा तलाव यावर्षी काठोकाठ भरलाय. गेली अनेक वर्षं दुष्काळानं होरळपलेली माणसं हे पाणी पाहून अक्षरशः हरखून गेली. त्यामुळे गावात उत्सवाचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी मनोभावे आणि थाटामाटात जलपूजनही केलं.
पुण्यापासून सुमारे ७० किलोमीटर पुरंदर तालुक्यातलं पिंगोरी हे दुष्काळी गाव... डोंगर दऱ्यांनी वेढलेलं असलं तरी याठिकाणी पाऊस अगदीच कमी पडतो… गावातला हा तलाव ७२ च्या दुष्काळानंतर बांधण्यात आला. मात्र, तेव्हापासून आजतागायत या तलावातला गाळ कधीच काढला गेला नव्हता. परिणामी पाण्याचं दूर्भिक्ष पाचवीला पुजलेलं... पण हे चित्र पालटलं ते पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या प्रयत्नांनी... मृतावस्थेतल्या या तलावाचं पुनरुज्जीवन झालं. तलावाची साठवणक्षमता वाढवण्यात आली. याशिवाय तलावाखालच्या भागातही विहीरी तसंच बंधारे बांधून पाणी अडवण्याची व्यवस्था करण्यात आलीय. उन्हाळ्यामध्ये तब्बल दोन महिने हे काम सुरू होतं. त्यासाठी ५० लाखांचा खर्च करण्यात आलाय.
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे हा तलाव पूर्ण भरलाय. ग्रामस्थांना हे पाणी पुढची किमान ३ वर्षं पुरणार आहे. सगळीकडे हिरवाई बहरलीय. गावाला लाभलेली ही जलसुरक्षा बाप्पाचीच कृपा असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.
महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानांकडे आज मोठ्या प्रमाणावर पैसा आहे. या धनाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व्हायला हवा. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ गणपती ट्रस्टनं याकामी पुढाकार घेतला. त्यामुळे संकट काळात धावून येतो तोच खरा देव याची अनुभूती पिंगोरी ग्रामस्थांना आलीय. आता गरज आहे ती इतर देवस्थानांनी यापासून प्रेरणा घेण्याची...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.