www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी ठरला असल्ययाचा दावा करण्यात आला आहे. याबाबत कोल्हापुरकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहचवू असं आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिलंय. मात्र टोल विरोधी समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.
आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीस कोल्हापुरकरांनी आज एकत्रपणे विरोध केला. आज सकाळपासूनच शहरतल्या सर्व टोल नाक्यावर टोल विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते जमा झाला होते. टोल भरु नका असं आवाहन या कार्यकर्त्यांनी वाहनचालकांना केलं.
कोल्हापुरकरांच्या या विरोधाला न जुमानता आयआरबी कंपनीच्या कर्मचा-यांनी टोलवसुली करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कंपनीच्या कामगारांना कोल्हापुरी हिसका दाखवत टोल नाक्यावरुन हुसकावून लावलं. या आंदोलकांनी शहरातल्या सर्व टोलनाक्यावर ठाण मांडल्याने वाहतुरीची कोंडी झाली तर कोल्हापूर-गगनबावडा हा मार्ग तीन तास ठप्प होता.
काल दिवसभर चाललेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी टोल विरोधी कृती समिती सोबत बैठक घेतली. त्यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी सहनशक्तीचा अंत पाहू नका असा इशारा जिल्हाधिका-यांना दिला. टोल विरोधी कृती समितीनं पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. सरकारनं या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ टोल रद्द बाबतची घोषणा करावी अन्य़था संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार कृती समितीनं केलाय त्यामुळे हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.