www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरात टोलला विरोध असतानाही आयआयरबी कंपनीच्या वतीने नऊ टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी टोल नाक्यावरील कामगारांना हुसकावत टोल वसुली बंद पाडली.
सकाळपासूनच टोल विरोधी कृती समितीचे सदस्य शहरातल्या नऊ टोल नाक्यांवर ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलकांनी वाहन चालकांना टोल न भरण्याचं आवाहन केलं. अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असल्यामुळं शहराकडे येणारी आणि शहरातून बाहेर जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प राहिली. फुलेवाडी नाक्यावर तर आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने कोल्हापूर-गगनबावडा राज्य महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आणि प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
आयआरबीने पुन्हा टोल वसुलीचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीने दिलाय. दरम्यान, आंदोलक आणि जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीला खासदार सदाशिव मंडलिक, एन. डी. पाटील यांच्यासह अनेक आंदोलक आणि कायकर्ते उपस्थित आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.