कलमाडींसोबत काम करणार नाही; राष्ट्रवादीची भूमिका

केंद्र सरकारच्या जेएनयुआरएम योजनेवरून पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार सुरेश कलमाडींना पुन्हा एकदा लक्ष्य केलं गेलं आहे. जेएनयुआरएम अंतर्गत करण्यात येणार्याश विकास कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद कलमाडींना देण्यात येणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 31, 2013, 10:29 AM IST

www.24taas.com,
केंद्र सरकारच्या जेएनयुआरएम योजनेवरून पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार सुरेश कलमाडींना पुन्हा एकदा लक्ष्य केलं गेलं आहे. जेएनयुआरएम अंतर्गत करण्यात येणार्याश विकास कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद कलमाडींना देण्यात येणार आहे. मात्र, कलमाडी या समितीचे अध्यक्ष झाल्यास राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार या समितीत काम करणार नाहीत. असा इशारा राष्ट्रवादीने दिलाय.
शहरांच्या विकासासाठी केंद्रा सरकारने आखलेली महत्वाकांक्षी योजना म्हणजे जेएनयुआरएम... रस्ते, सार्वजनिक वाहतुक, सांडपाणी प्रक्रिया अशा कामांसाठी केंद्र सरकार जेएनयुआरएम अंतर्गत महापालिकांना थेट निधी देते. पुणे महापालिकेला देखील जेएनयुआरएम अंतर्गत सुमारे 300 कोटींचा निधी दरवर्षी मिळतो. अशा या जेएमयुआरएम योजनेअंतर्गत करण्यात येणार्या कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या समितीचे पदसिध्द अध्यक्ष असणार आहेत स्थानिक खासदार. आणि अर्थातच त्यामुळे पुण्याच्या समितीचे अध्यक्ष असतील सुरेश कलमाडी. आणि इथेच वादाची ठिणगी पडली आहे...
राष्ट्रवादीच्या या विरोधाला उत्तर द्यायला कोणी कलमाडी समर्थक नाही तर काँग्रेसचे शहर अध्यक्ष पुढे आले आहेत. त्यामुळे या वादात काँग्रेस मधून निलंबित कलमाडींचे शहर काँग्रेसने अधिकृत रित्या समर्थन केले आहे.

राष्ट्रकूल स्पर्धा घोटाळ्यात कलमाडींवरील खटला प्रलंबित असल्याचं सांगत राष्ट्रवादीने कलमाडींच्या अध्यक्ष पदाला विरोध केलाय. खरे कारण मात्र वेगळेच असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाचा काही भाग महापालिका हद्दीत येतो. त्यामुळे सुळे यांना हे अध्यक्ष पद मिळावं यासाठी राष्ट्रवादीचा हा कांगावा असल्याचं बोललं जात आहे.