संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती...

स्वारगेट स्थानकातून भरधाव वेगात बस पळवून नऊ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय. संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी ही माहिती दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 21, 2013, 04:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
स्वारगेट स्थानकातून भरधाव वेगात बस पळवून नऊ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय. संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी ही माहिती दिलीय.
संतोष मानेला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केलं होतं. त्यात कलम २३५ (२) नुसार आरोपीला शिक्षेबाबत त्याचं म्हणणं मांडण्यास दिलं गेलं नसल्याचं, उच्च न्यायालयाने म्हटलंय. त्याबाबत पुणे न्यायालयाला पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्याच्या सत्र न्यायलयाने ८ एप्रिल रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावली होती. यावेळी माने हा राज्यासाठी कलंक असल्याचं मतही न्यायालयाने व्यक्त केलं होतं.
नऊ निष्पाप पुणेकरांचा बळी घेणारा आणि २७ पुणेकरांना जखमी करणारा क्रूरकर्मा संतोष माने... स्वारगेट डेपोला एसटी ड्रायव्हर ड्युटीवर नसताना डेपोतून एसटी पळवून नेऊन संपूर्ण पुण्यात त्यानं थैमान घातलं होतं. संतोष मानेवर ३०२ खून करणं, ३०७ खुनाचा प्रयत्न करणं, ३२६ गंभीर दुखापत, ३२४ दुखापत करणं, ३८१ नोकराकडून मालमत्तेची चोरी अशा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोष माने हा सामान्य माणसाचा शत्रू असल्याचं सांगत त्याचं वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशननं घेतला होता.
सोलापूर जिल्ह्यातल्या कैठाळे गावचा संतोष माने हा रहिवासी आहे. १९७१ चा जन्म असलेल्या मानेचे वय ४२ वर्ष आहे. तो स्वारगेट बस डेपोत २००९ मध्ये भरती झाला. एसटीमध्ये तो कायमस्वरुपी ड्रायव्हर होता. मानेने २४ जानेवारी २०१२ रात्री साडेसात वाजता स्वारगेटला गाणगापूर-पुणे एसटी घेऊन आला होता. त्यावेळी तो पुण्यात एसटीच्या रेस्ट हाऊसमध्ये राहात होता. मानेने २४ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ड्युटी नसताना आला होता. सातारा-स्वारगेट-सातारा ही बस त्यानं ताब्यात घेतली आणि बेभान होऊन त्यांने एसटी पळविली. यामध्ये काही गाड्या उडवत नऊ जणांचा बळी घेतला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.