www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राज ठाकरेंच्या पुण्यातल्या रॅलीसाठी मुंबईतही जय्यत तयारी सुरू आहे. जागेचा प्रश्न निकाली निघाल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मुंबईतून लाखोंच्या संख्येनं मनसैनिक पुण्याला जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबई-पुणे रस्त्यावरचा एकही टोल भरणार नाही, असा निर्धार मनसेनं केलाय. तसंच पुण्यातल्या या रॅलीचे मुंबईतही जागोजागी होर्डिंग्ज लावण्यात आलेत. दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या या सभेसाठी NCP च्या बड्या नेत्याचं वजन वापरल्याची चर्चा आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा अखेर एसपी कॉलेजच्या मैदानातच होणार आहे. एसपी कॉलेजनं अखेर परवानगीचं पत्र दिलंय. जवळपास तीन वर्षांनी एसपी कॉलेजच्या मैदानात राजकीय सभा होणार आहे. राज ठाकरेंची सभा कुठे होणार, यावरुन प्रचंड गोंधळ घालून झाल्यानंतर अखेर हे ठिकाण निश्चित केलंय.
कालपर्यंत मुठेच्या पात्रात ही सभा होणार असं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे पुण्यातल्या मनसे पदाधिका-यांनीच ही माहिती दिली होती. पण राज ठाकरे काल पुण्यात पोहोचल्यावर पुन्हा चक्रं फिरली आणि आता एसपी कॉलेजच्या मैदानातच ही सभा होणार आहे.
आम्हाला आडवं येणाऱ्यांना सडकून काढण्यासाठी आमच्या अध्यक्षांना पुण्यात जागा हवीय… जागा देता का जागा… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेची अवस्था अशीच काहीशी झाली होती. डेक्कन परिसरात, नदीपात्रातील मैदान ही मनसेची पहिली पसंती … मात्र त्याठिकाणी मनोरंजन नगरी भरलीय… त्यामुळे तो पर्याय बाजूला ठेवून नदीपात्रामध्ये संभाजी उद्यानाच्या बाजूला सभा घेण्याचा विचार पुढे आला… त्यासाठीची पोलिसांची परवानगीही मागण्यात आली… मात्र पुढे काहीच हालचाल झाली नाही… त्यानंतर राज ठाकरेंची सभा अलका टॉकिज चौकात घेण्याचा हेका मनसेनं धरला… मात्र वाहतूक तसंच सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी अलका चौकात सभेला नकार दिला.
अशा परिस्थितीत शहरातील sspms, b j medical यांसारखे पर्याय बाजूला ठेवत मनसेनं आपला मोर्चा एस.पी. कॉलेजकडे वळवला… मात्र राजकीय कार्यक्रमांना मैदान न देण्याचा ठराव झाला असल्याचं सांगत एसपीनही ठेंगा दाखवला होता …
एव्हाना सभा २ दिवसांवर येऊन ठेपली होती… त्यामुळे नाईलाजास्तव म्हणून उर्वरित नदीपात्रात सभेची तयारी सुरु झाली… अर्थात ही जागा सभेसाठी अयोग्य असल्याचं रडगाणं सुरूच ठेवत आयोजकांनी एसपीचा हट्ट कायम ठेवला.
आता प्रश्न केवळ सोयीचा किंवा गैरसोयीचा न राहता पक्षाच्या किंबहुना पक्षातील काही नेत्यांच्या प्रतिष्ठेचा बनला होता… स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे एसपीसाठी आग्रही असल्याचं बोललं जात होतं… त्यातच सभा एसपी वर होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सभेच्या एक दिवस आधी सुरु झाली… तसा दावा मनसेचे स्थानिक पदाधिकारी करत होते, मात्र कॅमे-यासमोर बोलायला कोणीच धजावत नव्हतं… संभ्रमित नेते आणि गोंधळलेले कार्यकर्ते हे चित्र शनिवार संध्याकाळ पर्यंत कायम होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.