www.24taas.com, झी मीडिया, पुणे
काँग्रेस सरकार धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केल्यावर काँग्रेसने त्यावर प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली आहे.
मोदींच्या या टीकेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आता एकमेकांचे बुरखे फाडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटणा-या काँग्रेसच्या मर्मावरच नरेंद्र मोदींनी घाव घातल्यामुळं काँग्रेसला हा आरोप चांगलाच झोंबलाय. त्यामुळं घायाळ काँग्रेसचे सर्वच नेते मोदींवर तुटून पडले आहेत. काँग्रेसनंही मग धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याचं समर्थन करत मोदींच्या नागड्या जातीयवादावर प्रहार केलाय.
तर दुसरीकडे काँग्रेसनं मोदींच्या गुजरात विकासाचा मुद्याची पहिल्यांदाच चिरफाड करण्याचा प्रयत्न केलाय. माजी क्रीडामंत्री आणि काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी मोदींनी गेल्या दहा वर्षात क्रीडा क्षेत्रात काय प्रगती केली असा थेट सवाल करत आव्हान दिले आहे.
काँग्रेस-भाजपचे नेते एकमेकांवर टीका करण्यात मश्गूल असताना भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे बुरखे फाडले आहेत. देश आर्थिक संकटातून जात असताना नेते निरर्थक मुद्यांवर वाद घालत असल्याचा चिमटा काँग्रेसह मोदींनाही काढलाय.
गुजरात दंगलीवर मोदींनी मौन सोडले आणि देशातले राजकीय वातावरण तापले. मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जात असल्यानं त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला आणि टीकेला काँग्रेसला उत्तर द्यावं लागतंय. यामुळं मात्र लोकसभा निवडणुकांचं घमासान आतापासूनच सुरू झाल्याचं चित्र देशात निर्माण झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.