www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक शहराची पेशवेकालीन ओळख असणा-या फुल बाजाराच्या स्थलांतराचा वाद चांगलाच चिघळलाय. महापौरांनी भेटीची वेळ दिली असतानाही त्याआधीच अतिक्रमण विभागाच्या पथकानं फुल विक्रेत्यांचं साहित्य जप्त केलं. त्यानंतर हा प्रश्न चांगलाच चिघळलाय.
ही अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई चालू आहे नाशिकच्या फुल बाजारात.. या परिसरातल्या सराफ व्यावसायिकांच्या तक्रारी नंतर आणि वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या कारणावरून फुल विक्रेत्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे फूल विक्रेत्यांना गणेशवाडीतल्या भाजी मार्केटमध्ये स्थलांतरित केलं जातंय. मात्र त्याठिकाणी व्यवसाय होणार नाही, त्यामुळे फुल विक्रेत्यांचा या कारवाईला विरोध आहे.
याचसंदर्भात महापौर फुल विक्रेत्यांना भेटणार होते. पण त्याआधीच अतिक्रमण विभागानं कारवाई केली. त्यानंतर फुल विक्रेत्यांनी महापौरांची भेट घेत बाजार न हटविण्याची विनंती केली. मात्र महापौर फुल बाजार हटविण्याच्या मुद्यावर ठाम आहेत.
फुल बाजार महापौरांच्याच प्रभागात आहे. पेशवेकालीन फुल बाजाराचं स्थलांतर केलं तर जुनी ओळख मनसेनं पुसून टाकल्याचा ठपका मनसेवर बसणार आहे. अतिक्रमण हटवलं नाही तर स्वतःच्या प्रभागातलं अतिक्रमणही महापौर काढू शकले नाहीत, असा संदेश जाणार आहे. त्यामुळे फुलबाजारावरुन महापौरांची चांगलीच गोची झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.