नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला एक महिन्यांहून कमी कालावधी उरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक अशी तोंडावर आली असताना असताना काँग्रेस भवनात मात्र निवडणुकीचा कोणताही मागमूस दिसून येत नाही. काँग्रेस भवनात सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे.
सुरेश कलमाडींच्या तिहार वारीमुळे काँग्रेस भवनाची अशी अवस्था झाली असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. तसंच समन्वय समितीत नसलेला समन्वय देखील यासाठी कारणीभूत ठरत आहे. काँग्रेसचे पुण्यातले नेतेदेखील ही अवस्था मान्य करत आहेत. पुणे महापालिकेत २००७ च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. २००७ च्या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र, आता सध्या काँग्रेसची पुण्यात दयनीय अवस्था झाली आहे आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी काँग्रेस नेत्यांकडून कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही.
तिहार तुरुंगात जाईपर्यंत पुणे काँग्रेसवर कलमाडींचं एकहाती वर्चस्व होतं. मात्र कलमाडी तिहारमध्ये गेल्यानंतर काँग्रेसमधला कलमाडी गट सैरभैर झाला आहे. तर कलमाडींची जागा घेण्यासाठी कलमाडी विरोधक प्रयत्नात आहेत. या साठमारीमध्ये पक्षवाढीकडे सर्वांचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काँग्रेस भवनात असा शुकशुकाट पहायला मिळत आहे.