www.24taas.com, झी मीडिया, लंडन
अॅन्डी मरेने वर्ल्ड चॅम्पियन नोवाक जोकोविचचा पराभव करून पहिल्या वहिल्या विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घातली. यामुळे तब्बल ७७ वर्षांनंतर एखाद्या इंग्लिश टेनिसप्लेअरला विम्बल्डन जेतेपद जिंकण्याचा बहूमान पटकावता आला. मरेने वर्ल्ड चॅम्पियन जोकोविचचा ६-४, ७-५, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
इंग्लंडला तब्बल ७७ वर्षांनी विम्बल्डन विजेतपद मिळालंय. यापूर्वी १९३६ मध्ये फ्रेड पेरी यांनी इंग्लंडला विम्बल्डनच विजेतेपद पटकावून दिलं होतं. यानंतर थेट २०१३ मध्ये अॅन्डी मरेने इंग्लंडला विम्बल्डनच विजेतेपद मिळवून दिलंय. मरेच्या या विजयामुळे ७७ वर्षांचा इंग्लंडसाठी विम्बल्डन विजयाचा असलेला दुष्काळ संपुष्टात आलाय.
अॅन्डी मरेने तिसरा सेट जिंकला आणि विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर जणू काही उत्सवाला उधाणच आलं. स्टेडियममध्ये उपस्थित फॅन्सनी टाळ्यांच्या गजरात नव्या विम्बल्डन चॅम्पियनचं दमदार स्वागतं केलं. तब्बल ७७ वर्षांनंतर इंग्लंडला टेनिसचा राजमुकूट परिधान करण्याची संधी मिळाली ती अॅन्डी मरेमुळे... फायनलपूर्वी सर्वांनी जोकोविचलाच संभाव्य विजेता घोषित केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात मॅचमध्ये मरेने घातलेला धुमाकूळ हा ब्रिटिश फॅन्सच्या मनात कायम घर करून राहणार आहे.
३ तास ९ मिनिटे चाललेल्या फायनलमध्ये मरेने जोकोविचचा 6६-४, ७-५, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. विम्बल्डन फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन जोकोविच मरेच्या धडाक्यापूढे निष्प्रभ ठरला. त्याचा प्रत्येक शॉट आणि सर्व्हिस ही एखाद्या नवशिख्यासारखी भासत होती. मरेने मॅचच्या सुरूवातीला घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली आणि अॅन्डी मरेनं इतिहास रचला. या मॅचला ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनसह, स्टार फूटबॉलर वेन रूनी, हॉलिवूड सेलिब्रिटिज आणि अनेक दिग्गज टेनिस प्लेअर्सनीही हजेरी लावली होती. मरेने आपल्या स्मॅश, बॅकहॅण्ड स्ट्रोक आणि नेटवरील शॉट्सने जोकोविचला हैराण करून सोडलं. संपूर्ण मॅचमध्ये केवळ अॅन्डी मरेचाच दबदबा कायम होता.
पहिल्या दोन्ही सेटमध्ये वरचढ ठरलेल्या मरेविरूद्ध जोकोविचने तिसऱ्या सेटमध्ये प्रतिकार केला खरा. मात्र, त्याचा प्रतिकार अयशस्वी ठरला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचला आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, मरेने बाणेदारपणे खेळ करताना तिसऱ्या सेटच्या दहाव्या गेममध्ये त्याचा हा डाव उधळून लावला आणि मरेने तिसऱ्या सेटचा सहावा गेम जिंकत आपल्या ऐतिहासिक कामगिरीची सुवर्णाक्षरांनी नोंद केली. अॅन्डी मरेच्या रूपात टेनिस विश्वाला नवा राजकूमार गवसला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.