'रोहयो`च्या लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

सिन्नर तालुक्यातल्या `रोहयो`च्या गटविकास अधिकारी आणि शाखा अभियंत्याला एक लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 29, 2014, 02:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारी रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचा पर्दाफाश 'झी मीडिया'ने केला होता. त्यानंतर सिन्नर तालुक्यात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही तोच गटविकास अधिकारी आणि शाखा अभियंत्याला एक लाख ७० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक झालीय.
आत्ता तोंड लपवून पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांनी सिन्नर तालुक्यात शासकीय यंत्रणेची उरलीसुरली सगळी लाज आज वेशीला टांगलीय. रोजगार हमी योजनेवरच्या गोरगरीब मजुरांच्या घामाचे, कष्टाचे पैसे हडप करण्याचा प्रयत्न या दोन बाबूंनी केलाय. यातला एक आहे सिन्नर तालुक्याचा गटविकास अधिकारी तर दुसरा आहे शाखा अभियंता.
सिन्नर तालुक्यातल्या कणकोरी गावाच्या तीनशेहून अधिक मजुरांनी १६ लाख रूपयांची कामं केली. त्या कामांची बिलं मंजूर करण्यासाठी या दोघांनी एक लाख ७० हजार रूपयांची मागणी केली होती. या मागणीला कंटाळलेल्या ग्रामरोजगार सेवकाने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शिताफीनं दाखल घेत लाचलुचपत विभागानं सापळा रचून या दोघांना रंगेहाथ अटक केली. या दोघा लाचखोर अभियंत्यांना न्यायालयात हजर केलं असता नायायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केलीय, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपास अधिकारी एस. के. शिंदे यांनी दिलीय.
रोजगार हमी योजनेतल्या कामात होणारा भ्रष्टाचार 'झी मीडिया'ने याआधीच उघड केला होता. त्यानंतर १४२ कामांच्या चौकशीचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्याचा अहवाल अजून आला नसतानाच या दोन सरकारी बाबूंना लाच घेताना पकडल्याने 'झी मीडिया'च्या वृत्त मालिकेवर शिक्कामोर्तब झालं.
या दोघांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिलीय. या दोघांनी अजून किती जणांची अशी कष्टाची संपत्ती खाल्लीय याचा तपास केला जाणार आहे. बुधवारी विधीमंडळाची रोजगार हमी योजना समिती नाशिक जिल्ह्यातल्या कामाची पाहणी करणार आहे. या भ्रष्टाचारांची समिती कशी दखल घेते आणि ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काय पावलं उचलते, याकडे आता लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.