पाणी नियोजन : `मनपा`ला नागरिकांचाही पाठिंबा

भविष्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं सोमवारपासून एक वेळचा पुरवठा बंद केलाय. मनपाच्या या निर्णयाने महिन्याकाठी ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 19, 2013, 10:06 AM IST

www.24taas.com, नाशिक
भविष्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं सोमवारपासून एक वेळचा पुरवठा बंद केलाय. मनपाच्या या निर्णयाने महिन्याकाठी ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. उन्हाळ्याचे चटके जरी नाशिकरांना अद्याप बसत नसले तरी पाणीकपातीच्या नियोजनाकडे नाशिककरांचं बारीक लक्ष असणार आहे.
मार्च महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटलाय. धरणातील पाणीसाठा ५० टक्यांपर्यंत आलाय. अशा परिस्थितीत पाऊस लांबला तर जुलै अखेरपर्यंत म्हणजे तब्बल साडेचार महिने नाशिककरांना आहे, तेव्हढ्या पाण्यात घालवावे लागणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठी- २५०० दशलक्ष घनफूट, काश्यपी धरणातील पाणीसाठा - ६५० दशलक्ष घनफूट, गौतमी धरणातील पाठीसाठा- ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यमुळे भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्याच्या दृष्टीनं महपालिका प्रशासनाने आता पासूनच पावलं उचलली असून शहरात केवळ एकवेळच पाणी पुरवठा केला जाणार आहे.
नाशिकच्या पूर्व, पश्चिम, मध्य आणि पंचवटी या चार विभागात १८ मार्चपासून एकवेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे. सिडको आणि सातपूर या विभागात सुरवातीपासूनच एकवेळ पाणी पुरवठा केला जात असल्यानं एक वेळच्या पाणी पुरवठ्यातही २० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. या कपातीच्या माध्यमातून ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

भविष्यातील नियोजनासाठी १५ फेब्रुवारीलाच दहा टक्के पाणी कपात आणि मंगळवारी पूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यामुळे नियोजन काही प्रमाणात बिघडलं होतं तर नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केलीय. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी पाणीकपातीच्या पालिकेच्या निर्णयाला नाशिककरांनी पाठिंबा दिला होता. भविष्यात धरणांमध्ये पाण्याचा खडखडाट जाणवू नये, यासाठी नाशिककर प्रशासनाच्या पाठीशी उभे आहेत. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनचाही फटका नाशिककरांनीच बसलेला आहे. त्यामुळेच यंदाच्याही कपातीतही पाणी पुरवठा विभागाच्या नियोजनाकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय.