www.24taas.com, नाशिक
नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं यातून स्पष्ट होतंय.
सराफी व्यवसाय करणारा सुरेश विसपुते हा टँकर चालक आणि मालकांना बनावट चाव्या बनवून देत होता.त्यासाठी तो हजारो रूपयेही घेत होता. त्याच्याकडून गॅस कटर, ठसा घेण्याचे साचे, पितळाचा ठोकळा असं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलंय. टँकर चालक सुनील उजवाल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मागच्या आठवड्यातच पोलिसांनी बाभूळवाडी शिवारात तेल भेसळ करताना सहा जणांना रंगेहाथ पकडलं होतं. त्यांच्याकडून 17 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. मात्र या परिसरात अजूनही इंधन भेसळ सुरूच असल्याचं या निमीत्तानं पुन्हा स्पष्ट झालंय.