गणरायाच्या निरोपाची लगबग...

सुरक्षा आणि बंदोबस्तासाठी पुण्यामध्ये सुमारे १६ हजारांची फौज तैनात असणार आहे. तर, वाहतुकीचे नियोजन म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील १४ रस्ते वाहनांसाठी बंद असणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 27, 2012, 08:51 PM IST

www.24taas.com, पुणे
अकरा दिवसांचा पाहुणा बनून आलेल्या गणरायाला निरोपाची लगबग सुरु झालीय. सुरक्षा आणि बंदोबस्तासाठी पुण्यामध्ये सुमारे १६ हजारांची फौज तैनात असणार आहे. तर, वाहतुकीचे नियोजन म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील १४ रस्ते वाहनांसाठी बंद असणार आहेत.
पुणे पोलीस यंत्रणा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालीय. पुण्यामध्ये साडे पाचशेपेक्षा जास्त गणपतींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते. अशा परिस्थितीत मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि लोकांनाही मिरवणुकीचा आनंद घेता यावा, यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाहतुकीचं विशेष नियोजन करण्यात आलंय.
विसर्जनाच्या दिवशी साडे आठ हजार पोलीस, एसआरपीएफच्या ६ तुकड्या, शीघ्र कृती दल, होम गार्डस, यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी आणि स्वयंसेवक अशी सुमारे १६ हजारांची फौज शहरात तैनात असणार आहे. सुरक्षिततेबरोबरच मिरवणूक लवकर संपवण्याचं आवाहनही करण्यात आलंय. गेल्या वर्षी मिरवणूक संपायला २७ तास लागले होते. यावर्षी हा अवधी कमी करण्याचा प्रयत्न आहे.
विसर्जनाच्या दिवशी हे रस्ते राहणार बंद...
विसर्जनाच्या दिवशी शिवाजी रस्ता - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौक ते टिळक चौक, सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक, देवजी बाबा चौक ते हमजेखान चौक, जेधे चौक ते टिळक चौक, दारूवाला पूल ते जिजामाता चौक, बुधवार चौक ते टिळक चौक, कुमठेकर रस्ता, बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज हे रस्ते बंद राहणार आहेत. याशिवाय, जंगली महाराज रस्त, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्त, भांडारकर रस्ता याठिकाणची वाहतूक दुपारनंतर आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. या बदलांशिवाय अनेक ठिकाणी नो पार्किंग आणि पादचारी मार्गांमध्ये बदल करण्यात आलेत.