www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्येच नव्हे तर राज्य पातळीवर सध्या थोर पुरुषांच्या स्मारकांची मागणी होऊ लागली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकापासून सुरु झालेली ही मागणी आता महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या मागणीपर्यंत येवून ठेपली आहे. मात्र नवीन स्मारकांची मागणी होत असताना जुन्या स्मारकांच्या दुर्दशेकडे बघायला न स्थानिक प्रशासनाला वेळ आहे ना मागणी करणा-यांना....
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात बाळासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे अशी मागणी होत असतानाच आता बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा पुढे आलाय. मात्र नाशिकमध्ये याआधी उभारण्यात आलेल्या स्मारकांचा आढावा घेतला असता स्मारके हवीत कशाला? असा प्रश्न नागरिकांनी विचारलाय. नाशिक शहरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या महान विभूतींच्या स्मृती जतन करण्यासाठी उद्यान विकसित करण्यात आली. मात्र आता या उद्यानांचा दारूच्या पार्ट्या, गर्दुल्ल्यांच्या अड्ड्याशिवाय वापर होत नाही. दादासाहेब फाळकेंच्या स्मारकाचं सौंदर्य ठेकेदाराच्या भांडणात हरवलंय. तर पंचवटी परिसरातलं सावरकरांचं अपूर्णावस्थेतल्या स्मारकाच्या उदघाटनासाठी पुन्हा नव्यानं तारीख शोधली जातेय. वामनदादा कर्डकांच्या स्मारकाचीही काही वेगळी अवस्था नाही. गाडगे महाराजांच्या स्मारकाभोवती तर कच-याचे ढिग साचलेत. आणि परिसरातले नागरिक त्याचा कपडे वाळविण्यासाठी उपयोग करत आहेत.
शहरातले सगळी स्मारकं आणि थोर पुरुषांच्या स्मृती जागविण्यासाठी जे प्रकल्प उभे आहेत त्यांची निगा राखण्याची पुन्हा एकदा महापौरांनी नव्यानं घोषणा केलीय. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती जतन करण्यासाठी स्मारक उभारण्याचा ठराव महासभेत करण्यात आलाय. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे नाशिक दौरा करण्याची शक्यता असल्यानं या दौ-यानंतरच स्मारकाचा मुद्दा निकाली लागणार आहे. मात्र आहे त्या स्मारकांची निगा राखण्यासाठी साहेब जोपर्यंत आदेश देणार नाही तोपर्यंत पावलं उचलली जातात की नाही? हे बघणं औत्सुक्याचं आहे.