वाघिणीचा १० तास ठिय्या, ग्रामस्थांची पाचावर

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे पट्टेदार वाघिणीनं तब्बल १० तास ठिय्या दिल्याने गावक-यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 7, 2013, 06:42 PM IST

www.24taas.com,चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे पट्टेदार वाघिणीनं तब्बल १० तास ठिय्या दिल्याने गावक-यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.
गावात वाघिण आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच प्रत्येकजण वाघिणीला पाहण्यास घटनास्थळी जमू लागला. यामुळे घटनास्थळी गर्दी झाली. या गर्दीमुळे वाघिण जिथे होती, तेथून ती बाहेर निघत नव्हती. त्यातही वाघिण गरोदर होती. त्यामुळं तिला जलद हालचाल करता येत नव्हती.
वाघिण गावात शिरल्याचे वृत्त कळताच चंद्रपूरचे वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी आपल्या कर्मचा-यांसह पोहोचले. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चिमूर, शेगाव, वरोरा, चंद्रपूर येथील पोलिस ताफा घटनास्थाळी पोहोचला. वन्यजीव संघटनांचे सदस्यही गावात पोचले. या सर्वांनी या वाघिणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. परंतु, लोकांच्या गर्दीमुळे वाघिण बाहेर येत नव्हती.

शेवटी भूलतज्ज्ञ गिरीश वशिष्ट हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर वाघिणीला गुंगीचे इंजेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. वाघिणीला गुंगीचे इंजेक्शन दिल्यानंतर बुधवारी संध्याकाळी तिला गावातून पिटाळून लावण्यात यश आल्याने गावक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या वाघिणीने एका वनकर्मचा-यास जखमी केले.