नर्सवर लैंगिक अत्याचार, काँग्रेस नेता फरार

लैंगिक छळाची तक्रार झाल्यानं नागपूर होमिओपथिक कॉलेजचे संस्थाचालक सध्या पोलिसांच्या भीतीने फरार आहेत. परंतु तक्रारकर्त्या महिलेची बाजू विचारता न घेता तिला नोकरीतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलंय. या सर्व प्रकरणामुळं संस्थाचालकानं कॉलेजलाच चक्क टाळे ठोकलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 1, 2012, 05:53 PM IST

www.24taas.com, नागपूर
लैंगिक छळाची तक्रार झाल्यानं नागपूर होमिओपथिक कॉलेजचे संस्थाचालक सध्या पोलिसांच्या भीतीने फरार आहेत. परंतु तक्रारकर्त्या महिलेची बाजू विचारता न घेता तिला नोकरीतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलंय. या सर्व प्रकरणामुळं संस्थाचालकानं कॉलेजलाच चक्क टाळे ठोकलंय.
गेली अनेक वर्षे नागपूर होमिओपथिक कॉलेजमध्ये परिचारिकेची नोकरी करत असताना नूतन रेवतकर यांना चांगल्या कामाबद्दल कितीतरी पारितोषिकं मिळाली आहेत. परंतु संस्थाचालकानं लैंगिक छळवणूक केल्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळं त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या या महिलेला न्याय देणं तर दूरच, उलट पोलिसांनी तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणलाय. संस्थाचालक घनश्यामदास पनपालिया हा काँग्रेसचा स्थानिक नेता असल्यानं पोलीस दबाव आणत असल्याचं नूतन यांचं म्हणणं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना पगार मिळत नसल्यानं ते संपावर आहेत. तसंच राज्याच्या आरोग्य विद्यापीठानं या महाविद्यालयाची मान्यता काढून घेतल्याने डॉक्टरकीचे स्वप्न उराशी बाळगणा-या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
संस्थाचालक घनश्यामदास पनपालिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर ते कॉलेजला टाळे लावून पसार झालेत. तसंच पोलीसही त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचं सांगण्यात येतंय. परंतु या सर्व प्रकरणामुळं कॉलेजचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडलंय.