मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकमेकांची उणी-धुणी काढल्यानंतर आता भाजप-शिवसेनेत समीट होताना दिसत आहे. केडीएमसीत युती झाली. आता पुढेचे पाऊल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. भेटीचा मुहूर्त दिवाळीनंतर आहे. याभेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे.
अधिक वाचा : ...तर केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री
शिवसेना सत्तेत राहून विकासाच्या मुद्द्यावर भाजपला चांगलेच घेरत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत जमत नसल्याचे चित्र पुढे येत होते. याचा प्रत्यय महानगरपालिका निवडणुकांत दिसून आला. दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. त्यामुळे संबंध ताणले गेले असतानाच तुटण्यापर्यंत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरुन भाजपचा टेकू काढण्याची भाषा केली.
जनतेची कामे होत नसलतील तर सत्ता हवेय कशाला, असा रोखठोक प्रश्न शिवसेनेने भाजपला केला. सेनेच्या मंत्र्यांनाच विश्वासात घेतले जात नसल्याचे मंत्र्यांचे गाऱ्हाणे लक्षात घेऊन जनतेची कामे व्हावीत यासाठी कटुता टाळून दिवाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
अधिक वाचा : राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, मित्र पक्षांना संधी
सेनाभवनात शिवसेना आमदारांच्या आयोजित केलेल्या बैठकीत राज्यात सरकारमध्ये असूनही कामे होत नसल्याची तक्रार बहुतेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने यासर्वांवर दोघांमध्ये चर्चा होणार आहे.
वाढता दुरावा दोन्ही पक्षांसाठी मारक असून पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या दहा महापालिका निवडणुकीत याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो हे बिहारच्या निवडणुकीने दाखवून दिले. राज्यातील ग्रामपंचायती व नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीलाही भरपूर जागा मिळाल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या दहा पालिकांच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमधील कटुता संपणे आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षांतील नेत्यांना वाटत असले, तरी पुढाकार कोणी घ्यायचा हा कळीचा प्रश्न होता.
या पाश्र्वभूमीवर कटुता सोडून समन्वयाची भूमिका घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, दिवाळीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची ते भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना आमदारांच्या कामांची यादी घेऊनच उद्धव भेटणार सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.