ऊठसूठ आंदोलनं करू नका, उद्धव ठाकरेंनी दिल्या कानपिचक्या!

केंद्रात मोठ्या कष्टानं आपलं सरकार आलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा. परंतु पहिल्या दिवसापासून आंदोलन करून वातावरण बिघडवू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कानपिचक्या दिल्या. 

Updated: Sep 10, 2014, 10:51 AM IST
ऊठसूठ आंदोलनं करू नका, उद्धव ठाकरेंनी दिल्या कानपिचक्या! title=

मुंबई: केंद्रात मोठ्या कष्टानं आपलं सरकार आलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा. परंतु पहिल्या दिवसापासून आंदोलन करून वातावरण बिघडवू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कानपिचक्या दिल्या. 

तर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये दलाली खाऊन बेसुमार नफा कमावणाऱ्या दलालांवर कारवाई करणारा कायदा करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली.

कांद्याचे दर कमी झाल्यानं निर्यात अनुदान द्यावं तसंच आयात थांबवावी या मागणीकरिता शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झालंय. याकडे ठाकरे यांचं लक्ष वेधलं असता ते म्हणाले की, सारखी सारखी आंदोलन करणं योग्य नाही. आपण आज केंद्रात सत्तेत असून उद्या राज्यातही सत्तेत येऊ. परंतु चर्चेनं प्रश्न सोडवले पाहिजेत. ते जर सुटले नाहीत तर आंदोलन करा. केंद्रातील मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळात अनेक गोष्टींचा पाया रचला गेला आहे. सरकार म्हणजे काही अर्ध्या तासात पिझ्झाची डिलीव्हरी नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह हे जळगावच्या दौऱ्यावर होते. तिथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. सरकार या नात्यानं आम्हाला जसं शेतकऱ्यांचं हित पाहायचं आहे. तसंच ग्राहकांचं हित देखील पाहणं गरजेचं आहे, असं केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्यांना सांगितलं. 

शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दलाल बेसुमार नफा कमावत असून त्याला पायबंद घालणाऱ्या तरतुदी कायद्यात नाहीत. त्यामुळं केंद्र सरकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचं केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं, त्याकडे खडसे यांनी लक्ष वेधलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.