www.24taas.com, मुंबई
शिवसेना आणि मनसेत आता इनकमिंग आणि आऊट गोईंगचा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. अनेक शिवसेनेचे नेते मनसेत येण्यास इच्छुक असल्याच्या बाळा नांदगावकरांच्या वक्तव्याचा शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला आहे.
सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा खरपूस समाचार घेतला. ४० काय ४०० जणांना न्या. असा टोला उद्धव यांनी मनसेला लगावला आहे. निष्ठावान शिवसैनिक कधीही पक्ष सोडून जाणार नाही असंही उद्धव यांनी म्हटलं आहे.
‘अच्छा? अगदी आनंदाने घेऊन जा. जर येत असतील तर त्यांना घेऊन जा. पायघड्या घाला आणि नांदगावकरांना म्हणा ‘नांदा सौख्य भरे!’ स्वत: जर का आनंदात असाल तर म्हणतोय मी. त्या कन्नडच्या त्यांच्या आमदाराने काय म्हटलंय त्यांच्याविषयी? ठाण्याच्या त्यांच्या जुन्या कार्यकर्त्याने काय म्हटलंय? ते नांदगावकरांच्या वाचनात आलं नसेल कदाचित. ते आधी वाचा आणि जे कोणी चाळीस काय चारशे येत असले तरी घेऊन जा.
अहो, एक जरी आला तरी मी म्हणेन तुमचा जाहीर सत्कार! मुळात ते स्वत: आनंदात आहेत काय? स्वत: विकाऊ म्हणून दुनिया विकाऊ होत नाहीय. ठीक आहे, तुमचा आनंद तुमच्याकडे. शिवसैनिकांच्या वाटेला जाऊ नका आणि शिवसैनिकांमध्ये फालतू संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.