दुसऱ्या मजल्यावरून कार खाली कोसळली; दोघांचा मृत्यू

मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात एका विचित्र अपघातात एका शाळकरी मुलासह दोघांचा मृत्यू झालाय.

Updated: Apr 21, 2016, 08:49 AM IST
दुसऱ्या मजल्यावरून कार खाली कोसळली; दोघांचा मृत्यू title=

मुंबई : मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात एका विचित्र अपघातात एका शाळकरी मुलासह दोघांचा मृत्यू झालाय.

बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास आग्रीपाड्यातल्या इक्बाल हाईट्स या इमारतीच्या कार लिफ्टमधून गाडी खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. अपघात दुपारी झालेला असला, तरी तो समोर येण्यासाठी संध्याकाळचे सात वाजले. 

या अपघातात इयत्ता आठवीत शिकणारा हाफिज पटेल (१४ वर्ष) आणि त्याच्या गाडीचा चालक इक्बाल जावेद (३२ वर्ष) हे दोघेही मृत्यूमुखी पडले. 

कसा झाला अपघात

बिल्डिंगमध्ये आल्यानंतर कारला लिफ्टच्या साहाय्यानं दुसऱ्या मजल्यावर नेण्यात आलं. तेव्हा अचानक ड्रायव्हरचा पाय एक्सलेटरवर पडल्यानं कार पुढे सरकली... आणि लिफ्टचा दरवाजा तोडून दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. 

कशी समजली अपघाताची बातमी

हाफिज शाळेतून वेळेवर परतला नसल्यानं त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी हाफिजच्या मोबाईलचं लोकेशन शोधल्यावर तो इक्बाल हाईट्समध्येचं असल्याचं पुढे आलं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधून हा अपघात झाल्याचं दिसलं. 

अपघात झाल्याचं कळल्यावर गाडीतून मृतदेह काढण्यासाठी तीन ते चार तास प्रयत्न करावा लागला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण आग्रीपाडा परिसारात हळहळ व्यक्त होतेय.,