राष्ट्रवादीच्या दबावापुढे काँग्रेसची शरणागती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढं पुन्हा एकदा काँग्रेसला सपशेल लोटांगण घालावं लागलं... काँग्रेसच्या हक्काची जागा असतानाही, मोहन जोशींना आपला उमेदवारी अर्ज मागं घेणं भाग पडलं. त्यामुळं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालीय.

Updated: Aug 14, 2014, 07:30 PM IST
राष्ट्रवादीच्या दबावापुढे काँग्रेसची शरणागती title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढं पुन्हा एकदा काँग्रेसला सपशेल लोटांगण घालावं लागलं... काँग्रेसच्या हक्काची जागा असतानाही, मोहन जोशींना आपला उमेदवारी अर्ज मागं घेणं भाग पडलं. त्यामुळं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालीय.

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे मोहन जोशी विरूद्ध राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असा आघाडीतच थेट सामना रंगणार होता. शिवसेना-भाजपा युतीनं या निवडणुकीत उमेदवारच दिला नव्हता. अगदी बुधवारी रात्रीपर्यंत सत्ताधारी आघाडीतले दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. राष्ट्रवादीच्या दबावापुढं, दादागिरीपुढं माघार घेऊ नये अशी थेट भूमिका काँग्रेसच्या मंत्र्यांनी बैठकीत मांडली. मात्र एकाच रात्रीत काँग्रेसला आपली ताठर भूमिका मवाळ करावी लागली. आघाडीच्या राजकारणात तडजोड करावी लागते, अशी भाषा करत काँग्रेसला निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.

काँग्रेसच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत असं काही घडलं की, आधी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना मांजर होऊन उमेदवारी मागे घ्यावी लागली. राष्ट्रवादीनं थेट प्रदेशाध्यक्षांना या निवडणुकीत उतरवल्यानं ते माघार घेणार नाहीत, हे स्पष्टच होतं. या भूमिकेवर राष्ट्रवादी शेवटपर्यंत ठाम राहिली आणि सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली.

विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष तटकरे आपल्या मतदारसंघात अडकून राहू नयेत, त्यांना प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरता यावं यासाठी राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलंय. मात्र त्यासाठी त्यांना काँग्रेसवर दबावाचं राजकारण खेळावं लागलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.