मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात भक्तांना डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्सही दान करता येणार आहेत.
मंदिर संस्थानने भक्तांना शेअर्स दान करता यावेत यासाठी 'एसबीआय कॅप सिक्युरिटीज' सोबत करार केला आहे. त्यामुळे आतापर्यंत रोख पैसे किंवा सोन्याच्या स्वरूपात दान करण्यासोबतच सिद्धीविनायकाला प्रसन्न करण्यासाठी भाविक शेअर्सही दान करू शकणार आहेत. त्यासाठी सिद्धीविनायक मंदिर संस्थाननं स्वतःच डिमॅट अकाऊंट ओपन केले आहे.
भाविकांना त्यांच्या डीमॅट अकाऊंटमधले शेअर्स संस्थांनच्या अकांऊटमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करता येणार आहेत. पुढच्या काळात भाविकांना गोल्ड ईटीएफही सिद्धिविनायकाला दान करता येतील असे संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे मंदिर संस्थान भाविकांनी ट्रान्सफर केलेले शेअर्स त्याच किंवा दुसऱ्या दिवशी विकून त्याचं रोख दानात रुपांतर करणार आहे. त्यासाठी बाजाराच्या स्थितीचा विचार केला जाणार नाही असंही संस्थानने स्पष्ट केले आहे.