मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. युती होणं तर तसं कठीण दिसतंय आणि त्याला कारण आहे शिवसेना-भाजपमधील शीतयुद्ध.
प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलंय. केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपचं पुढचं लक्ष्य मुंबई महापालिका आहे असं त्यांनी म्हटलंय.
वर्षभरानं होणा-या मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं राजकारणातलं महत्त्व भाजपश्रेष्ठी चांगलंच जाणतात.
गेली १५ वर्ष महापालिकेवर फडकणारा शिवसेनेचा भगवा उतरवण्याची तयारी भाजपकडून सुरु झालीय. तर दुसरीकडे शिवसेनेनंही स्वबळाची चाचपणी सुरु केली आहे.
विद्यमान महापालिकेत शिवसेनेचे स्वतःचे 75 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 32 नगरसेवक आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपचे 15 आमदार, तर शिवसेनेचे 14 आमदार निवडून आलेत. 227 पैकी सुमारे 160 वॉर्डात भाजप आघाडीवर आहे.
मुंबईत शिवसेना आणि कॉँग्रेसला शह देण्यासाठी मतविभागणीचं हत्यार पुन्हा उपसलं जाऊ शकतं. या काळात मनसे, एमआयएम आणि यांसारख्या पक्षांचं महत्त्व अचानक वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.