युती होणार की नाही, याचा फैसला आज सायंकाळी

शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती करणार की स्वबळावर लढणार याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज  सायंकाळी पक्षमेळाव्यात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

Updated: Jan 26, 2017, 08:06 AM IST
युती होणार की नाही, याचा फैसला आज सायंकाळी title=

मुंबई : शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती करणार की स्वबळावर लढणार याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज  सायंकाळी पक्षमेळाव्यात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

२६ जानेवारी रोजी मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदानावर सायंकाळी ५ वाजता शिवसेनेचा ‘निवडणूक’ मेळावा होणार असून राज्यभरातील शिवसेनेचे सर्व गटप्रमुख, लोकप्रतिनिधी आणि शाखाप्रमुखांपासून विभागप्रमुखांपर्यंतचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. 

यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. या महामेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. युतीचे काय होणार, शिवसैनिकांना कोणता आदेश मिळणार, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील २५ जिल्हा परिषदा, मुंबई-ठाण्यासह दहा महानगरपालिका आणि २८५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर युती होणार की नाही, याची चर्चा सुरु आहे. बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र, युतीची भिजत घोंगडे पडले आहे.

शिवसेनेचे निवडणूक गीत सादर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी संगीतबद्ध केलेल्या नवीन शिवसेना गीताच्या ध्वनिचित्रफितीचे अनावरण या वेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.