www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शक्तीमिल कंपाऊंडमध्ये फोटोजर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणी आज तीन नराधमांवर नव्यानं आरोप ठेवण्यात आले आहेत. यावेळी या तिघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळल्यानं सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावे द्यावे लागणार आहेत.
कासिम बंगाली, विजय जाधव आणि मोहम्मद अन्सारी हे या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. त्यांनी एकच गुन्हा दोन वेळा केला आहे. ते सराईत बलात्कारी आहेत त्यामुळं त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३७६(ई) अंतर्गत आरोप ठेवण्यात यावेत, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती. निकम यांच्या अर्जावर आज सुनावणी झाली.
आरोपींनी हे आरोप अमान्य केले. आता उद्याच सरकारी पक्ष आपले आरोप सिद्ध करण्यासाठी नव्यानं पुरावे सादर करणार आहे, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिलीय. आधी टेलिफोन ऑपरेटर आणि नंतर पत्रकार महिला अशा दोघांना शक्तीमिलच्या आवारात गँगरेपच्या भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. यातील टेलिफोन ऑपरेटवरील बलात्कारप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं चार आरोपींना शुक्रवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावलीय.
कलम ३७६ (ई) मध्ये बलात्काऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद असून तिघा नराधमांना नेमकी कोणती शिक्षा न्यायालय सुनावतं हे आता उद्याच कळू शकेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.