ईस्टर्न टू वेस्टर्न हायवे... २० मिनिटांत!

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आजपासून मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईची पूर्व आणि पश्चिम उपनगरं एकमेकांच्या आणखी जवळ येणार आहेत आणि सहाजिकच मुळातच वेगात असणारी मुंबई आणखी वेगात धावणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 18, 2014, 09:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आजपासून मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईची पूर्व आणि पश्चिम उपनगरं एकमेकांच्या आणखी जवळ येणार आहेत आणि सहाजिकच मुळातच वेगात असणारी मुंबई आणखी वेगात धावणार आहे.
अखेर ११ वर्षांच्या विलंबानंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड सुरू होणार आहे. या नव्या मार्गामुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवे जोडले जाणार आहेत आणि अर्थातच पूर्व आणि पश्चिम उपनगरंही त्यामुळे एकमेकांच्या जवळ येणार आहेत. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातला पहिला डबल डेकर फ्लायओव्हर या मार्गावर आहे. एकूण साडे तीन किलोमीटर लांबीचा हा मार्ग आणि साधारण एक किलोमीटरचा अमरमहल जंक्शन फ्लायओव्हर  वाहतुकीसाठी खुले होतायत. त्यामुळे मुंबईचा वेग आणखी वाढणार आहे.
या नव्या रस्त्यामुळे सायन, धारावी टी जंक्शन आणि कलानगर जंक्शन या ठिकाणी होणारा ट्रॅफिक जाम कमी होणार आहे. तसंच चेंबूर, कुर्ला, धारावी, वांद्रे, सांताक्रूझ या मार्गावर होणारी वाहनांची गर्दीही कमी होणार आहे. सायन, कलानगर, धारावी या भागांमधून प्रवास करताना पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागायचा. मात्र या नव्या रस्त्यामुळे हाच प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांत होणार आहे.
सुरुवातीला या प्रकल्पाचं काम १०० कोटींपेक्षा जास्त होतं. मात्र ११ वर्ष हा प्रकल्प रखडल्यामुळे या प्रकल्पाची किंमत ४५० कोटींपर्यंत पोहोचलीय. विशेष म्हणजे आचारसंहिता असल्यानं या मार्गाचं उदघाटन होणार नाही, तर तो थेट मुंबईकरांसाठी खुला होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.