www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यादरम्यान सध्या सुरु असलेल्या सत्तेच्या जोड-तोडीमध्ये आता काँग्रेसनंही तोंड खुपसलंय. उद्धव - राज या भावांमध्ये भांडण लावून भाजप लोणी खातंय, अशी थेट टीका काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी केलीय.
`सरदार वल्लभभाई पटेल यांचे सर्वांत उंच स्मारक उभारणारा राज ठाकरे यांच्या उंबरठ्यावर गुडघे टेकून उभा आहे` असं संजय निरुपम यांनी म्हटलंय. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप-शिवसेना-मनसे यांची जवळीक उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या संजय निरुपम यांच्या मुळावर येण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे, या मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात राज ठाकरे यांनी उमेद्वार उभा केला नाही किंवा फिक्सिंग झाली तर तुम्ही कसे निवडून याल? या प्रश्नावर मात्र संजय निरुपम चांगलेच संतापले.
मराठीचा मुद्दा उचलून धरणाऱ्या राज यांना शेट्टी हे गैरमराठी उमेदवार कसे चालतात, असा सवाल त्यांनी यावेळी केला. मुंबई उपनगरातील वीजग्राहकांच्या वीजबिलात २० टक्के सवलत न दिल्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारविरुद्ध निवडणुकीनंतर आंदोलन छेडणार असल्याचंही संजय निरुपम यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.