महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक काका पुतण्यांची काहणी

महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांची मोठी परंपरा आहे.

Updated: Feb 3, 2016, 08:29 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक काका पुतण्यांची काहणी  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांची मोठी परंपरा आहे. यापैकी अनेक पुतण्यांनी आपल्या काकांना अडचणीत आणल्याची उदाहरणं आहेत. सध्या अशीच एक काका-पुतण्यांची जोडी वादाच्या भोव-यात सापडलीय....

काका, मला वाचवा... सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी पुण्याच्या शनिवारवाड्यात नारायणराव पेशव्यांनी फोडलेला हा टाहो... पण सध्या हाच आवाज ऐकू येतोय तो राजधानी मुंबईत... मनी लाँड्रिग प्रकरणी पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाल्यानं छगन भुजबळ काकांच्या साम्राज्याला धक्का बसलाय. पुतण्यानं काकाला अडचणीत आणलंय की, काकामुळं पुतण्याची ही अवस्था झालीय, नेमकं काय ते कळत नाहीय.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेलं दीड दशक गाजलं ते काका-पुतण्यातल्या राजकीय संघर्षानं.. काकाच्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं, मात्र वारस ठरवण्याची वेळ आली तेव्हा काकानं पुतण्याला दूर सारून मुलाला किंवा मुलीला पुढं आणल्याची उदाहरणं याच मातीत पाहायला मिळतात. त्यातूनच काका-पुतण्या संघर्षाला धार आली.

ठाकरे विरूद्ध ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात गाजलेला काका-पुतण्या संघर्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला... राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार असतील अशी चर्चा होती. मात्र घडले वेगळेच. बाळासाहेबांनी आपला मुलगा उद्धव ठाकरे यांना गादीवर बसवल्यानंतर राज ठाकरेंनी बंडाचा झेंडा फडकवला. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केला.

पवार विरूद्ध पवार

शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यात राजकीय संघर्ष असला तरी तो कधीच उघडपणे समोर आलेला नाही. शरद पवारांनीही हा संघर्ष होऊ नये म्हणून स्वतः काळजी घेतलीय. सुप्रिया सुळे दिल्लीच्या, तर अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष देतील, अशी सीमारेषा पवारकाकांनी आखून दिलीय. अजित पवारांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता काका स्वतः राज्याच्या राजकारणात जातीनं लक्ष घालतात.. म्हणजेच अजित पवारांना त्यांनी अजून मोकळा हात दिलेला नाही.

मुंडे विरूद्ध मुंडे

राजकारणात गाजलेली काका पुतण्यांची आणखी एक जोडी म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे... गोपीनाथ मुंडे राज्यात आणि दिल्लीत संघर्ष करत असताना त्यांचा बीडचा बालेकिल्ला सांभाळला तो धनंजय मुंडेंनी... मात्र राजकीय वारस निवडण्याची वेळ  आली तेव्हा गोपीनाथ मुंडेनी कन्या पंकजाच्या पदरात माप टाकलं. त्यामुळं नाराज धनंजय मुंडेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पुतण्या जेलमध्ये, भुजबळ काकांचं काय?

आणि सध्या नाशिकच्या काका-पुतण्याची जोडी गाजतेय ती वेगळ्या कारणासाठी.. खरं तर भुजबळ काका-पुतण्यांमध्ये तसा वाद कधी झालाच नाही. छगन भुजबळांचा पुतण्यावर एवढा विश्वास होता की, त्यांच्या खात्याचा कारभारही समीरच सांभाळत होते. त्यांच्या व्यवहारांमुळेच भुजबळ काका अडचणीत आल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालीय...