www.24taas.com,मुंबई
संघटनात्मक बांधणी करताना कार्यकर्त्यांबरोबर विभागवार संवाद साधण्यासाठी मेळावे आयोजित करा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, राज संघटन बांधणी नव्याने करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क अध्यक्षांकडून राज ठाकरे यांच्याकडे जिल्ह्यानुसार अहवाल सादर करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी हे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेमध्ये केवळ आंदोलनाच्या काळातापुरते सक्रिय होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे; पण कार्यकर्ता केवळ आंदोलनात नाही तर इतर वेळीही नागरिकांच्या सेवेला हजर असावा, यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यावर भर असण्यासाठी राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे.
अनेक जिल्ह्यांत काही पदाधिकाऱ्यांमध्ये साठमारी सुरू आहे. अशा वेळी या कार्यकर्त्यांचा लेखाजोखा थेट उपलब्ध व्हावा, यासाठी शिवसेनेच्या धर्तीवर मनसेतही जिल्हा संपर्क अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती. आपापल्या जिल्ह्यातील पक्षाच्या कामगिरीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारे अहवाल तयार होत असल्याची कुणकुण लागल्याने अनेक जिल्ह्यांतील कार्यकर्ते अधिक सक्रिय झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. या अहवालांचे वाचन राज यांच्याकडून झाल्यावर काही संघटनात्मक बदल होण्याची शक्ययताही व्यक्त होत आहे.