www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. टोल आकारणीच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत असलं, तरी दोन्ही बाजूंकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचं टाळलं जात असल्यामुळे एकूणच या भेटीच्या हेतुबाबत शंका घेतली जाऊ लागली आहे.
यापूर्वीही १० ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यावेळी हा मुद्दा समोर येण्याऐवजी त्यांच्या लूकबद्दल जास्त चर्चा झाली होती. आजारापणातून बाहेर पडल्यामुळे राज ठाकरे यांनी फ्रेंच दाढी ठेवली होती. त्यामुळ ते आपले काका बाळासाहेब ठाकरे यांची कॉप करत असल्याची चर्चा झाली होती.
गेल्या १० ऑगस्टला झालेल्या चर्चेनंतर या प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज ठाकरे यांना दिले होते. परंतु, या संदर्भात अद्याप काहीच पाऊले उचलली गेली नाहीत, या संदर्भात आपण असमाधानी असल्याचे राज ठाकरे यांना दाखवून द्यायचे आहे. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांनी भेट घेतल्याचे मनसेमधील सूत्रांनी सांगितले आहे.
या भेटीबाबत प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले नाही, त्यामुळे या भेटीमागचा हेतुबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात ज्या घटना घडामोडी झाल्या त्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिले जात आहे.