मुंबई : 'आयएनएस कोलकाता' या अत्याधुनिक युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश होतोय. नौदलाचं सामर्थ्य वाढवणारी ही युद्धनौका असणार आहे. 16 ऑगस्टला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल.
भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी नौदलाने माझगांव डॉकयार्डला 3 अत्याधुनिक विनाशिका म्हणजेच डिस्ट्रॉयरची ऑर्डर 2000 मध्ये दिली. या तीन युद्धनौकांच्या वर्गाला कोलकाता क्लास असे नाव देण्यात आलं. या वर्गातील पहिली युद्धनौका आयएनएस कोलकाताच्या बांधणीला सप्टेंबर 2003 मध्ये सुरुवात झाली. मार्च 2006 मध्ये या युद्धनौकेचं जलावतरण झालं. तर चाचण्यांचे अनेक अडथळे पार पाडत अखेर ही युद्धनौका सज्ज झाली आहे. या युद्धनौकेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे हिची वैशिष्ट्यपूर्ण रचना.
विविध क्षमतेची रडार, पाणबुडीचा शोध घेणारी सोनार यंत्रणा, विविध पल्ल्यांच्या तोफा, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे, युद्धनौकेवरुन हवेत मारा कऱणारी क्षेपणास्त्रं अशी वैविध्यपूर्ण अस्त्र या युद्धनौकेवर आहेत. मात्र यापैकी सर्वात संहारक शस्त्र आहे ते म्हणजे ब्राम्होस क्षेपणास्त्र.
पूर्ण क्षमतेनं सज्ज झाल्यास या युद्धनौकेचं वजन 7 हजार 500 टनाच्या घरात जाणार आहे. एका दमात ही युद्धनौका काही हजार किलोमीटरचा पल्ला सहज गाठू शकते. यावरील शक्तिशाली रडारामुळे तर 300 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराच्या परिघात सहज नजर ठेवता येणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे या युद्धनौकेवरील 80 टक्क्यापेक्षा जास्त यंत्रणा या स्वदेशी बनावटीच्या आहेत.
कोलकाता वर्गातील आणखी दोन युद्धनौका म्हणजे आयएनएस कोची आणि चेन्नई येत्या दोन वर्षांत नौदलात दाखल होणार आहेत. त्यामुळे नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर पडणार आहे.
युद्धनौकेचे वैशिष्ट्य -
- 'आयएनएस कोलकाता' ही युद्धनौका 164 मीटर लांब,
-18 मीटर रुंद आणि साडेसात हजार टन वजनाची
- 'प्रोजेक्ट १५ ए' अंतर्गत कोलकाता वर्गातील तीन स्टेल्थ (शत्रूच्या रडारला न दिसणारी)
- आयएनएस कोलकाता' ही या वर्गातील पहिलीच अद्ययावत विनाशिका
- २६ सप्टेंबर २००३ रोजी माझगाव गोदीमध्ये बांधणीस सुरुवात
- बोधचिन्हामध्ये पार्श्वभूमीस हावडा ब्रीज, जगप्रसिद्ध बंगाली वाघ
- 'युद्धासाठी सदैव तयार' (युद्धाय सर्वसन्नध) हे बोधवाक्य
काय असणार या नौकेवर ?
- स्टेल्थ डिझाइनमधील नवीन संकल्पनांचा वापर
- लांब पल्ल्याची हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे
- दीर्घपल्ल्याची भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारी क्षेपणास्त्रे
- रॉकेट लाँचर्स, पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रे
- संगणक प्रणाली पूर्णपणे भारतीय बनावटीची
- दोन हेलिकॉप्टर्ससाठी हँगर्स, तीन हेलिकॉप्टर्स एकाच वेळी ठेवण्याची व्यवस्था
- पाणतीर (टॉर्पेडो) डागण्याची स्थिर यंत्रणा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.