मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा समोर आलाय. मंगळवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रण दिलेच नव्हते असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेय.
एनडीए बैठकीबाबत आम्हाला काही माहिती दिली नव्हती तसेच साधे निमंत्रणही दिले नव्हते. यामुळे आम्ही नाराज आहोत. याबाबत वेंकय्या नायडू यांच्याकडे आम्ही नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यानी आपली चूक कबूल केली, असे सावंत म्हणाले.
दरम्यान, भाजपकडून झालेल्या विसंवादामुळे हे घडल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच ईपीएफ काढताना ६० टक्के कर लावण्याबाबतच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध असल्याबाबत त्यांना विचारले असता राऊत यांनी काही बोलण्यास नकार दिला.
भाजप नेहमीच शिवसेनेला दुय्यम स्थान दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असते. या घटनेनंतर या दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस वाढण्याची चिन्हे दिसू लागलीत.