www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपण कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही. त्यामुळे कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी गुजराती समाजाचा इशारा धुडकावून लावला आहे.
मुंबईतील गुजराती समाजाबद्दल केलेल्या विधानांसंदर्भात उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी बिनशर्त जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा गुजराती समाजानं दिला होता. त्यामुळे नितेश राणे आणि गुजरात समाजातला तिढा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितेश राणेंनी गुजराती समाजाचा इशारा फेटाळला आहे.
गुजराती समाज नरेंद्र मोदींची उघडपणे स्तुती करत आहेत. इतकंच नाही तर त्यांनी आता थेट नितेश राणेंना आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या गुजराती समाजाबद्दल राणेंनी केलेली विधानं गुजराती भाषिकांना खटकलीत. याप्रकरणी राज्य सरकार दरबारी न्याय मिळत नसल्यानं, अखेर नितेश राणेंवर कारवाईसाठी गुजराती समाजानं गुजरात विकास मंचच्या माध्यमातून कार्यवाही सुरु केली आहे.
गुजरात विकास मंचनं जुहू पोलीस ठाण्यात राणेंविरोधात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवर सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास तसंच राणेंनी गुजराती समाजाची बिनशर्त जाहीर माफी न मागितल्यास न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय पदाधिका-यांनी घेतला आहे. याची माहिती, गुजरात विकास मंच पदाधिकारी जास्मीन शहा यांनी दिली.
गुजराती समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता थेट विधानभवनात आवाज उठवण्याचीही तयारी सुरु केली आहे. गुजरात विकास मंचनं विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. तसे जास्मीन शहा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वादाची अधिकच ठिणगी पडण्याची शक्यत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.