सहा महिन्यात दोनदा आपटण्याचा राणेंचा विक्रम!

वांद्र्याच्या लढाईत माजी मुख्यमंत्री नारायण राणे दणकून आपटले. कुडाळपाठोपाठ वांद्र्यातही शिवसैनिकांनी राणेंना पराभवाची धूळ चारली. राजकीय धूमशानाच्या या दुसऱ्या अंकातही राणेंचं पुरतं वस्त्रहरण झालं.

Updated: Apr 15, 2015, 06:35 PM IST
सहा महिन्यात दोनदा आपटण्याचा राणेंचा विक्रम! title=

मुंबई : वांद्र्याच्या लढाईत माजी मुख्यमंत्री नारायण राणे दणकून आपटले. कुडाळपाठोपाठ वांद्र्यातही शिवसैनिकांनी राणेंना पराभवाची धूळ चारली. राजकीय धूमशानाच्या या दुसऱ्या अंकातही राणेंचं पुरतं वस्त्रहरण झालं.

कोंबडी, चपला हातात घेऊन नाचत 'एक लाडू दोन लाडू नारायण राणेंना वांद्र्यात गाडू, असा...' असं म्हणत आपल्या विजयाच्या धुंदीत नाचताना शिवसैनिक आज वांद्र्यात पाहायला मिळाले. नारायण राणेंना धूळ चारल्यानंतर शिवसैनिकांचा हा जल्लोष... हा उन्माद... हा विजयोत्सव होता. कुणी कोंबड्या आणल्या, तर कुणी अरविंद भोसलेंसाठी चपला... कुणी राणेंच्या जुहूच्या घराबाहेर आतषबाजी केली... कारण आधी कुडाळ आणि आता वांद्रे... मातोश्रीच्या अंगणात, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेवर चाल करून आलेल्या राणेंना शिवसेनेनं अस्मान दाखवलं होतं. ज्या मातोश्रीनं नारायण राणेंना मोठं केलं, त्याच मातोश्रीच्या दारात राणेंना हा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला, याचा आनंद शिवसेनेला होता. 

वांद्र्याच्या या लढाईत शिवसेनेच्या तृप्ती सावंतांना ५२ हजार ७११, तर काँग्रेसच्या राणेंना केवळ ३३ हजार ७०३ मतं मिळाली. एमआयएम उमेदवार राजा रहेबर खान यांना अवघी १५ हजार ५० मतं मिळाल्यानं त्यांचं कार्ड इथं चाललं नाही. तृप्ती सावंत यांनी राणेंसारख्या बलाढ्य उमेदवाराचा १९ हजार मतांनी दणदणीत पराभव केला. 

दरम्यान, नारायण राणेंनी अत्यंत संयमानं पराभवाचा स्वीकार केला. एवढंच नव्हे तर आपली इनिंग अजून संपलेली नाही, हे देखील स्पष्ट केलं. पण, वांद्र्यातला हा पराभव नारायण राणेंच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळं घायाळ झालेले राणे आता काय पवित्रा घेतात, याकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.