मुंबई: यूपीएची सत्ता असताना परकीय गुंतवणूकीला विरोध दर्शवणाऱ्या 'स्वदेशी' समर्थक भाजपनं सत्तेवर येताच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजूरी दिली, असं निदर्शनास आणून देत भाजप हा रंग बदलणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. 'अच्छे दिन येणार' असं सांगणाऱ्यांनी महागाईवरुन जनतेचा भ्रमनिरास केला असा टोलाही नारायण राणेंनी मोदी सरकारला लगावला आहे.
काँग्रेसच्या प्रचार प्रमुखपदावर वर्णी लागल्यावर नारायण राणेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपवर जोरदार टीका करत प्रचाराची झलकच दाखवली आहे. भाजपनं दिलेली आश्वासन पूर्ण केलेली नसून केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष आहे, असं नारायण राणेंनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची अवहेलना केली जात होती. याविषयी नारायण राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही आदर करतो. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे प्रमुख आहेत. यापुढं आम्ही त्यांचा अनादर खपवून घेणार नाही.
१ सप्टेंबरपासून मुंबईतील हुतात्मा चौकातून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात करु अशी घोषणाही नारायण राणेंनी केली. स्वतंत्र विदर्भाला काँग्रेसचा विरोध नाही. तसंच बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा हीच काँग्रेसची इच्छा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आघाडी सरकारनं गेल्या चार वर्षात केलेली कामं विजय मिळवून देण्यास पुरेशी आहेत असंही त्यांनी नमूद केलं.
निलेश राणेंचं भास्कर जाधव यांच्याविषयीचं मत वैयक्तिक असल्याचं राणेंनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.