मुंबई : राज्य सरकारने मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर आता विरोधक आक्रमक झालेत. सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा विषय लावून धरू, सरकारला फेरविचार करण्यास भाग पाडू, अशी घोषणा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.
मुस्लीम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे सदस्य हा विषय उचलून धरतील, अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने सर्वसमावेशक विचार न करता घाईगडबडीत मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सरकारने मुस्लिम आरक्षण पुन्हा लागू केले नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निर्णयावरून सरकारवर टीका केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.