www.24taas.com,मुंबई
मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवाशांचे आज तिस-या दिवशीही हाल सुरुच आहेत. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आजही तीस ते चाळीस मिनिटे उशीरानं सुरु आहे. त्यामुळं रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी उसळलीये.
शनिवारपासून मध्य रेल्वेच्या कळवा -मुंब्रा ते ठाणे दरम्यान वेगवेगळ्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळं शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर लोकल कासवगतीनं धावत होत्या. हा मेगाब्लॉक आज पहाटे पूर्ण झाला. मात्र याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम व्हायचा तोच झाला. लोकल वाहतुकीचा आजही बोजवारा उडाला.
सकाळपासून रेल्वे वाहतूक तीस ते चाळीस मिनिटे उशिराने सुरु होती. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी होती. रेल्वेकडून माहिती देण्यात येत होती. मात्र लोकलचा मात्र पत्ता नव्हता. सकाळी ऑफिस गाठणा-यांचे आजही हाल होतायेत.
मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा हँगओव्हर आजही उतरलेला नाही. मेगाब्लॉकमुळे आज मध्य रेल्वेच्या लोकल्स अर्धा तास उशीरानं धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलयं. त्यामुळं सलग तिस-या दिवशीही प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत.
कळवा मुंब्रा मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेनं मेगाब्लॉक पुकारला होता. हा मेगाब्लॉक आज पहाटे संपला. मात्र याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला. आज पहाटेपासूनच लोकल उशिरानं धावत होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी सकाळी उसळली होती.