मुंबई गँगरेप : पाचव्या आरोपीला दिल्लीत अटक

मुंबईतल्या महिला फोटोग्राफवर गँगरेप प्रकरणी मुंबई पोलिसांना पाचही आरोपींना अटक करण्यात यश मिळालंय. या प्रकरणातील पाचवा आरोपी सलीम अन्सारी याला मुंबई क्राइम ब्रॅंचच्या पोलिसांना आज दिल्लीत अटक केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 25, 2013, 12:49 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या महिला फोटोग्राफवर गँगरेप प्रकरणी मुंबई पोलिसांना पाचही आरोपींना अटक करण्यात यश मिळालंय. या प्रकरणातील पाचवा आरोपी सलीम अन्सारी याला मुंबई क्राइम ब्रॅंचच्या पोलिसांना आज दिल्लीत अटक केली. त्यापूर्वी आज पहाटे चौथ्या नराधमाला अटक करण्यात आली होती. तर, तिसऱ्या आरोपीला शनिवारी सायंकाळी महालक्ष्मी परिसरातून अटक करण्यात आली होती.
दिल्लीत अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सलिम अन्सारी असून बलात्काराच्या घटनेनंतर आपल्या साथीदारांना अटक झाल्याचं कळताच सलीम दिल्लीत पसार झाला होता. लोकमान्य टिळक टर्मिनस इथून गाडी पकडून सलिम दिल्लीत गेला होता. जुन्या दिल्लीतील आपल्या नातेवाईकांकडं त्याचा मुक्काम होता. मात्र, नातेवाईकांना त्यानं घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. त्याच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकानं जुन्या दिल्लीत कसून शोध घेत अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सलीमला आज संध्याकाळपर्यंत मुंबईत आणलं जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान, पहाटे अटक करण्यात आलेला कासिम बंगाली आणि सिराज रेहमान या दोघांना थोड्या वेळापूर्वीच किला कोर्टात हजर करण्यात आलं असून त्यांनाही ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी आज पहाटे अटक करण्यात आलेला कासिम बंगाली हा नराधम सर्व आरोपींमध्ये वयानं मोठा आहे आणि त्यानं तरुणीवर दोनदा बलात्कार केल्याचं कळतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.