www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबई गँगरेप प्रकरणातील चौथा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. आज पहाटे चौथ्या आरोपीला अटक करण्यात आलीय. सिराज रेहमान असं या आरोपीचं नाव आहे. त्याला गोवंडी परिसरातून अटक करण्यात आलीय. तर या प्रकरणातल्या तिसऱ्या आरोपीला शनिवारी सायंकाळी महालक्ष्मी परिसरातून अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौथा आरोपी कसीम बंगाली याला पहाटे चारच्या सुमारास अटक केली. शनिवारी अटक करण्यात आलेला आरोपी सिराज रेहमान आणि आज पहाटे अटक करण्यात आलेल्या कसीम बंगाली याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याआधी पोलिसांनी आरोपी चांदबाबू शेखला शुक्रवारी, तर जाधवला शनिवारी पहाटे दक्षिण मुंबईतील मदनपुरामधील एका व्हिडिओ पार्लरमधून अटक केली होती. एकूण पाच आरोपीपैंकी चार आरोपी पोलिसांच्या हाती लागलेत. अजुनही या प्रकरणातील पाचवा आरोपी सलीम अद्याप फरार आहे. लवकरच या प्रकरणातील पाचव्या आरोपीला गजाआड करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, याआधी पकडण्यात आलेल्या चांदबाबू सत्तार शेख ऊर्फ मोहम्मद अब्दुल आणि विजय जाधव या दोन्ही आरोपींना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. भोईवाडा कोर्टानं ही कोठडी सुनावली. हे दोघेही विशीच्या आतील आहेत. आपल्या कृत्याचा पश्चाात्ताप झाल्याचा लवलेशही आज त्यांच्या चेहेऱ्यावर नव्हता. त्यापैकी एक तर सुनावणीदरम्यान सर्रास जांभया देत होता. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिल्याची माहिती पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.