मंत्र्यांची वादग्रस्तविधाने, मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी

राज्यातील सरकारला या महिन्याच्या अखेर दोन वर्ष पूर्ण होत असतानाच मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे हैराण आहेत. 

Updated: Oct 15, 2016, 07:54 PM IST
मंत्र्यांची वादग्रस्तविधाने, मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी title=

दीपक भातुसे / मुंबई : राज्यातील सरकारला या महिन्याच्या अखेर दोन वर्ष पूर्ण होत असतानाच मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे हैराण आहेत. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि आता सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या वादग्रस्त विधानांमुळे मुख्यमंत्र्यांसमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे विरोधकांच्या हातीही सरकारला घेरण्यासाठी आयती संधी मिळत आहे यात भाजपाचा मित्रपक्ष आणि सरकारमध्ये सहभागी असलेला शिवसेनाही मागे नाही.
 
आधी गिरीश महाजन, नंतर महादेव जानकर आणि आता राजकुमार बडोले.. राज्यातील मंत्र्यांमध्ये जणू वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धाच सुरू आहे. मात्र यामुळे सरकारची प्रतिमा आणि सरकारबद्दल लोकांच्या मनातील रोष वाढत आहे आणि पर्यायाने यामुळे थेट मुख्यमंत्र्यांचीच डोकेदुखी वाढत आहे. 

भगवान गडाच्या पायथ्याशी दसऱ्याच्या दिवशी झालेल्या सभेत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला. गुरुवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत तर मुख्यमंत्र्यांनीही जानकर यांना खडे बोल सुनवल्याचे समजते. नाशिक येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याचा तर थेट सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेच समाचार घेतला.
 
गिरीश महाजन आणि महादेव जानकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उडलेला धुरळा खाली बसतो ना बसतो तोच सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आगीत तेल ओतले आहे. राज्यभर निघणाऱ्या लाखोंच्या मराठा समाजाच्या मोर्चाबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे तर सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
 
मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांनाही सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना घेरण्याची आयती संधी मिळाली आहे. याप्रकरणी आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
 
सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराची सरकारने एकीकडे जोरात जाहिरात सुरू केली आहे. तर दुसरीकडे मंत्र्यांच्या असा वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यांमुळे सरकारची नकारात्मक बाजूच लोकांसमोर जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना डॅमेज कंट्रोलच्या भूमिकेत जावे लागणार आहे.