अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: मेट्रो-३साठी आवश्यक असणारी कारशेड आता आरे कॉलनीतच होईल असं आता सरकारनं स्पष्ट केलंय. महसूलमंत्री आणि दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी याविषयीची परवानगी दिलीय.
मुंबईत इतरत्र एवढी मोठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळंच मेट्रो ३ची कारशेड आरे कॉलनीतच होणार हे जवळपास निश्चित झालंय. याविषयी मुख्यमंत्र्यानी एक विशेष समिती नेमलीय. या समितीनं अद्याप अहवाल दिलेला नाही. पण इतर जागांविषयी शिफारस या समितीनं शिफारस केली, तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू असंही खडसेंनी झी चोवीस तासशी बोलतांना म्हटलंय.
आरे कॉलनीतली ३० हेक्टरची जागा मेट्रो-३च्या कारशेडसाठी देण्यात येणार आहे. ही कारशेड उभारते वेळी मोठ्याप्रमाणात झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळंच या कारशेडला शिवसेना, मनसे आणि भाजपच्याही नेत्यांनी विरोध केला होता. त्यानंतरच राज्यसरकारनं निर्णय मागे घेऊन समिती स्थापन केली. पण प्रत्यक्षात हा सगळा विरोध धाब्यावर बसवून सरकारनं आता जमीन मेट्रोच्या प्रकल्पासाठी जमीन देऊ केलीय.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिलीय.. अजूनपर्यंत मेट्रो ३ कारशेडबाबत निर्णय झाला नसून अहवालाची प्रतीक्षा करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही ते म्हणाले. यावरून पुन्हा एकदा सरकारमध्ये सुसंवाद नसल्याचं स्पष्ट झालंय.
No decision yet on #Aarey land to be given for Metro Car Shed. The report is still awaited. Rumours are not to be believed.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.