नाशिक: नाशिकच्या महापौरपदासाठी रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नाशिकचे आमदार आणि स्थानिक नेते वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, स्थायी समिती अध्यक्ष राहुल ढिकले मुंबईत दाखल झाले आहेत.
12 सप्टेंबरला नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजपनं मनसेबरोबरची युती तोडून आता शिवसेनेबरोबर घरोबा केलाय, त्यामुळं चिंतेत सापडलेल्या मनसेला आता महापौरपद टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायला लागणार आहे.
शिवसेनेनं सुधाकर बडगुजर यांना महापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलंय. मनसेच्या 4 नगरसेवकांनी महापौरपदासाठी अर्ज सादर केले आहेत. भुजबळांवर आरोपांच्या फैरी झाडत मनसेनं सत्ता काबीज केली असल्यानं राष्ट्रवादीबरोबर जायचं का नाही? याबाबत या बैठकीत निर्णय घेण्याची सत्वपरीक्षा राज ठाकरेंची आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.