विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, मंत्र्यांचं आश्वासन

आरोग्य विज्ञान विघापीठानं दुहेरी पेपर तपासणी सुरू केल्यामुळं विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये नाराजी आहे. पेपर दोघांकडून तपासून घेऊन त्याची सरासरी काढण्याची पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. यामुळे मेडिकलचे तब्बल ११ हजार ९०० विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळं ही पद्धत बदलण्याची मागणी जोर धरतेय. मार्डनंही याविरोधात संपाची हाक दिलीये.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 14, 2013, 08:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आरोग्य विज्ञान विद्यापीठानं दुहेरी पेपर तपासणी सुरू केल्यामुळं विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये नाराजी आहे. पेपर दोघांकडून तपासून घेऊन त्याची सरासरी काढण्याची पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. यामुळे मेडिकलचे तब्बल ११ हजार ९०० विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळं ही पद्धत बदलण्याची मागणी जोर धरतेय. मार्डनंही याविरोधात संपाची हाक दिलीये.
आरोग्य विज्ञान विद्यापीठानं यंदापासून दुहेरी तपासणी पद्धत सुरू केलीय. दोन परिक्षकांकडून एक पेपर तपासून घ्यायचा आणि त्याचा ऍव्हेरेज काढून ते गुण ग्राह्य धरायचे, अशी ही पद्धत आहे. याप्रकारामुळं ३४ हजारांपैकी तब्बल ११ हजार ९०० विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर अनुत्तीर्णचा शिक्का बसलाय. या अॅव्हेरेज पद्धतीमुळं एखाद्या मार्गानं विषय राहिल्याचे प्रकार घडलेत. त्यामुळं ही पद्धत तातडीनं बंद करावी अशी मागणी विद्यार्थीच नव्हे, तर महाविद्यालयांचे डीनही करतायत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी याची दखल घेत पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक तफावत असलेल्या किंवा एक-दोन गुणांनी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे पेपर तिसऱ्या परिक्षकाकडून तपासण्यास तत्वतः मान्यता दिलीये.

निवासी डॉक्टरांची संघटना मार्डनंही या निर्णयाला विरोध केलाय. सरासरी काढण्यापेक्षा 'बेस्ट ऑफ टू' पद्धत ग्राह्य धरावी, अशी मागणी करत मार्डनं २४ तारखेला राज्यभर लाक्षणिक बंदचा इशारा दिलाय.
हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठावर धडक दिली. हा अन्यायकारी निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा आणि पेपर तपासण्याची सर्वमान्य पद्धत लागू करावी, अशी मागणी विद्यार्थी करत होते. यात मार्ड तसंच राष्ट्रवादी युवक संघटनेनंही सहभाग नोंदवला होता.
तर झी मीडियानं या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर आता शासनालाही जाग आलीये. मेडिकलच्या पेपर तपासणीत असलेल्या त्रूटी दूर करून योग्य मार्ग काढण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दिलेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, मार्डचा संप होण्यापूर्वी यावर तोडगा काढला जाईल, असं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी दिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.